भारतातील ऑटो सेक्टर बद्दल जाणून घ्या( know about the Indian auto sector)

भारतातील हे मार्केट अगदी मोठे आहे आणि याबद्दल असेही म्हटले जाते कि हे सेक्टर सुरक्षित आहे अनेक गुंतवणूकदार स्वतःचा पैसा या सेक्टर मध्ये गुंतून आहेत आणि त्यांना मिळालेला नफाही भरगोस असा आहे आणि म्हणूनच मला असे वाटते कि याबद्दल आपल्याला थोडी माहिती द्यावी जी आपल्या खूप कमी येईल.

शेअर मार्केटमध्ये दीर्घ मुदतीसाठी व फंडामेंटल अनॅलिसिस करून गुंतवणूक करताना, त्या कंपनीची एकूण कामगिरी हा घटक फार महत्त्वाचा असतो. तथापि ती कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये व्यवसाय करत आहे यालादेखील महत्त्व आहे, कारण प्रत्येक सेक्टरचे काही फायदे-तोटे व गुणधर्म आहेत. त्यांचा त्या सेक्टरमधील कंपन्यांवर अपरिहार्यपणे परिणाम होत असतो. त्याकरीता सेक्टर म्हणजे काय, याविषयी अधिक माहिती करून घेऊ.


ऑटोमोबाइल, बँकिंग व फायनान्शिअल, पॉवर, सिमेंट, टेक्सटाइल्स, आयटी, स्टील, शुगर असे सुमारे ९० सेक्टर आहेत. सुमारे म्हणण्याचे कारण असे की ऑटोमोबाइल हा एकच सेक्टर धरून त्या खाली चार चाकी वाहने, दुचाकी वाहने, ट्रॅक्टर, कार, ट्रक, बसेस इत्यादी मॅन्युफॅक्चर करणाऱ्या सर्व कंपन्यांचा आपण त्यात अंतर्भाव करू शकतो किंवा ह्या प्रत्येक प्रकारासाठी वेगळा सेक्टर धरू शकतो.


उदा. ऑटोमोबाइल दुचाकी व तीन चाकी वाहने. यात बजाज ऑटो व हिरो मोटोकॉर्प मुख्यतः येतात. ऑटोमोबाइल - कार व जीप. यात मारुती सुझुकी व महिंद्र इत्यादी कंपन्या येतात. टाटा मोटर्स ही कंपनी कारही बनवते, त्यामुळे ती याही प्रकारात येते.






मात्र ती सुरुवातीपासूनच अवजड वाहनेही बनवते. त्यामुळे ऑटो-लाइट, मीडिअम व हेवी कमर्शियल वाहने म्हणजे बसेस, ट्रक या सेक्टरमध्येही ती येते. अशोक लेलँडही याच सेक्टरमधील. याशिवाय ऑटो-ट्रॅक्टरमध्ये एस्कॉर्ट व एचएमटी इत्यादी कंपन्या येतात. त्याचबरोबर या कंपन्यांना किंवा या वाहनांना लागणारे स्पेअर पार्टस मॅन्युफॅक्चर करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या ऑटो-अन्सलिअरिज या सेक्टरमध्ये येतात. अमरा राजा बॅटरीज, एक्साइड, बोश, मिंडा इंडस्ट्रीज इत्यादी कंपन्या याच उप-सेक्टरमधल्या. ऑटोमोबाइल सेक्टरमधील वेगवेगळ्या कंपन्यांची व्यावसायिक कामगिरी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे या सेक्टरमधील सर्वच कंपन्यांच्या शेअरचा भावही एकाच दिशेने असतो, असेही नाही.


विशिष्ट कालावधीत काही कंपन्यांचे शेअरचे भाव वर तर, काहींचे खाली असे असू शकतात. तरीही त्या सेक्टरसाठी सर्वसाधारणपणे काही समान अनुमान काढता येते. उदा. लोक कार घेतात ते सहसा कर्ज घेऊन. निदान बहुसंख्य लोक वाहनखरेदीसाठी कर्ज घेतात. त्यामुळे बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले किंवा बँकांनी सढळपणे कर्ज देणे कमी केले की, कारची मागणी कमी होते. शेअर मार्केट मग या कंपन्यांच्या शेअरचे भाव खाली आणते. तसेच आर्थिक मंदीचा काळ असेल तर, लोक कार विकत घेणे पुढे ढकलतात. त्यावरून अनुमान काढूनही भाव खाली येतात. स्टील, अॅल्युमिनियम हे वाहनांच्या निर्मितीसाठी लागणारे काही मुख्यः घटक. विशेषतः स्टील. त्यामुळे यांच्या किमती वाढल्या तर, वाहनांच्या किमती त्या प्रमाणात किंवा काही प्रमाणात वाढतात. त्यामुळे विक्रीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. इतकेच काय स्टील बनवण्यासाठी लोह धातुकं लागतात. त्यांचे भाव वाढले तर, स्टीलचे भाव वाढतात. त्यामुळे कार महाग होतात.


थोडक्यात असा साखळी परिणाम होतो. तसेच अनेक वाहन कंपन्या आपली उत्पादने निर्यात करतात. २०११-१२ या आर्थिक वर्षात चार चाकी, दुचाकी, तीन चाकी वगैरे, सर्व मिळून देशात २ कोटी ३ लाख वाहनांची निर्मिती झाली. त्यांपैकी सुमारे तीस लाख वाहने निर्यात केली गेली. त्यात प्रथमच कारच्या निर्यातीने पाच लाखाचा टप्पा ओलांडला. अशी निर्यात ही कंपन्यांसाठी आणि देशासाठी चांगली गोष्ट आहे, पण बाहेरच्या देशात मंदी असेल, तरीही या सेक्टरवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि चिंतेचा विषय म्हणजे, पेट्रोल-डिझेलचे वाढत जाणारे भाव. ते बघूनच इतकी धडकी भरते की, कार घेण्याचा विचार मनात त्याहीपेक्षा जास्त वेगाने पळून जातो. वाहनांना शहरातून जशी मागणी असते तशीच ग्रामीण भागातूनही असते. पीकपाणी चांगले आले, चांगल्या प्रतीचे बियाणे मिळाले तर सुबत्ता प्राप्त होऊ शकते व तिथून वाहनांची मागणी वाढू शकते.


त्यात ट्रॅक्टर, मोटारसायकल, जीप यांची मागणी आधी वाढते. तसेच ऑटो-अॅन्सलिअरीज या सेक्टरची कामगिरी ऑटो सेक्टरवर अवलंबून असल्याने, त्यातील तेजी-मंदीप्रमाणे त्यातही त्याप्रमाणे वारे वाहत असतात. ऑटोमोबाइल सेक्टर हा सायक्लीकल म्हणजे तेजी-मंदीचे चक्र असलेला सेक्टर आहे. तो सतत सलग अनेक वर्षे तेजीत किंवा सतत मंदीत असणारा असा तो नसतो. त्यामुळे या सेक्टरमध्ये एंट्री घ्यायची असेल तर, म्हणजे या सेक्टरमधील कंपनीचे शेअर घ्यायचे असतील तर, वरील सर्व बाबींचा तसेच सध्या तो सेक्टर तेजीत आहे की मंदीत याचा विचार करावा.


निफ्टी ५० (उच्चारी : निफ्टी फिफ्टी) म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील पन्नास प्रमुख कंपन्यांचा निर्देशांक. याची २५ एप्रिल २०१३ला मागील एक वर्षाची कामगिरी बघितली तर, या निर्देशांकात १०.२४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. उलट निफ्टी ऑटो हा निर्देशांक याच कालावधीत फक्त २.६० टक्क्यांनी वर गेला आहे. या निफ्टी ऑटो निर्देशांकातील कंपन्यांच्या शेअरनी याच कालावधीत किती रिटर्न दिले याकडे नजर टाकू








AUTO SECTOR RETURN


टाटा मोटर्स लिमिटेड -५.७३ टक्के मारुती सुझुकी १४.२४ टक्के महिंद्रा अँड महिंद्रा २५.७१ टक्के अशोक लेलँड -२९.११ टक्के दुचाकी वाहने : बजाज ऑटो ९.६६ टक्के हिरो मोटोकॉर्प -२६.५१ टक्के ऑटो सेक्टरने दिलेले अॅव्हरेज रिटर्न बघितले तर, शेअर गुंतवणूकदारांना सीएनएक्स निफ्टीच्या तुलनेत त्यातून चांगले रिटर्न मिळालेले नाहीत, मात्र या सेक्टरमधील काही कंपन्यांनी दिलेल्या रिटर्नमध्येही किती फरक आहे, ते इथे स्पष्ट दिसते.








म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर घ्यायचे ठरवतो, तेव्हा ती ज्या सेक्टरमध्ये आहे, त्या सेक्टरमधील इतर कंपन्यांच्या तुलनेत तिची कामगिरी कशी आहे व पुढे कशी कामगिरी करेल, हे बघणे हिताचे आहे. सेक्टरविषयी माहिती घेणे म्हणजे, कंपनीच्या व्यवसायाविषयी माहिती घेणे, अर्थात तुलना करण्यासाठी त्याचबरोबर त्या सेक्टरमधील लिडर कंपन्या कोणत्या आहेत, आपण निवडलेली कंपनी कितव्या स्थानावर आहे, हे जाणून घेण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. गुंतवणूक करण्यापूर्वी अशी माहिती मिळवणे केव्हाही चांगले. सर्वच सेक्टरचा आपल्याला आढावा घेता येणे शक्य नाही, तरीही आणखी काही मोजक्या सेक्टरविषयी आपण क्रमाक्रमाने जाणून घेऊ. मात्र हा आढावा आपण फक्त शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या संदर्भात घेणार आहोत. एकूण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात नाही.

Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म